Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
सिंधुबाई
संकीर्ण लेख

सिंधुबाई

sindhu“बाई, डोकं लई दुकतंय. आठ दिस रजा द्या,” माझ्या घरी काम करणारी बाई म्हणाली. मी म्हटलं, “अगं, मग माझं काम कोण करणार? बदली बाई तरी दे. मला इतकं काम झेपत नाही ग”
“अवो आठ दिसला कोन येनार? सर्वे गावाला गेलेत. उच्छाव हाय गावाला पुनव आली ना?”
“गावाला म्हणजे कुठे ग?”
“तिकडे पार खेड तालुक्याला म्हंजे इथे येस्टी नाय तर ट्रकात बसायचं, खेडच्या पुडे उतरायचं, मंग चालायचं, पुन्हा यस्टीत बसायचं. माज्या भावाला एकल्याला जायला सुधरत नाही म्हणून, माजी आय पन गेली बघा. आता मी तरी कुनाला पाटवू सांगा.”
“तुझा भाऊ म्हणजे माळी काम करतो तोच ना?” सिंधूने मान डोलावली.
मग सिंधुबाई आठ दिवस आलीच नाही. मलाच सगळे काम करावे लागले. ती कामावर आली तेव्हा तिच्या डोक्याला फडकं बांधलेलं होतं आणि म्हणत होती “डोकं दुकतं बगा” त्यासाठी तिने औषध मात्र घेतलं नव्हतं तरी ती कामाला मात्र लागली. तिची बहीण, भावजय, आई, सगळ्याच बायका इथे नवनव्या होणाऱ्या इमारतीत घरकामाला होत्या. सिंधुबाईचा भाऊ सोडल्यास सगळ्यांचे दादले गावाला होते. या बायका इथे कामं करून गावाला पैसे पाठवत होत्या.
एक दिवस सिंधुबाईने कनवटीच्या चुरगळलेल्या नोटा काढून देत म्हटलं, “ हे पैसे तुमच्याकडे ठेवा.” मी म्हटलं,”अगं अजून तू पगार नाही घेतलास आणि वर पैसे देतेस.” ती म्हणाली, “आसूद्या. पगार कूटे पळतोय.”
मग दर दोन दिवसांनी ती नोटा देत राहिली. सहाशे-सातशे रुपये जमले. मी म्हणाले, “अगं सिंधू , तू करणार काय या पैशांचं? तुझं डोकं दुखतंय. डॉक्टरांकडे चल म्हटलं तर तू येत नाहीस.” मग ती खाली बसली आणि डोळे बारीक करीत म्हणाली, “बाई, मला माझ्या गावच्या घराचं छप्पर दुरुस्त करायचं हाये.” “मग तुझा नवरा काय करतो? तो नाही का पैसे खर्च करीत?”
“अवो बाई, माजा न्हवरा येडा हाय. तो कामधाम करीत न्हाई. आता तुम्हाला काय सांगायचं.” “मग तुला एवढी चार मुले कशी गं झाली?” सिंधुबाई खो-खो हसत सुटली. म्हणाली, “अवो न्हवरा येडा असला म्हणून काय झालं? मुलंबाळ व्हतात की.”
मी मग जास्ती बोलले नाही. ती काम आटोपून निघून गेली.
दोन दिवसांनी सिंधूची आई जिजाई तिच्याबरोबर कामाला आली. कारण सिंधूच डोकं दुखत होतंच. मी न राहवून म्हणाले, “डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवू या तुला. कदाचित चष्मा असेल तुला. चल, आज येतेस माझ्याबरोबर?”
जिजाई म्हणाली, “आनी हिला काय चष्मा घेऊन देणार तुम्ही?” (ती आश्चर्य व्यक्त करत होती)
मी, “हो, का बरं?”
जिजाई आणि सिंधू एकमेकींकडे पाहून हसल्या. मला काही कळत नाही अशा अविर्भावात जिजाई म्हणाली, “अवो आमच्या गावात, सगेवाल्यांमधी कुनी कुनी आजून चष्मा लावला नाय, आणि हे काय तुमी तिला चष्म्याचं सांगता?”
मी, “तुमच्या गावात कुणी चष्मा लावला नसेल तर नसू दे. हिने का लावू नये? निदान डोळे तपासायला काय हरकत आहे.”
जिजाई , “चष्मा लावून तुमच्यासारका पेपर वाचनार व्हय? चष्मा लावून कुटं भांडी घासतात का?तिला मग खुचीवर बसायला लागेल.”
जिजाई हे सगळं गंभीरपणे बोलत होती. मला तर तिचे हे तत्त्वज्ञान कळेचना. मी सिंधुबीला विचारल. तीही म्हणाली, “मी काय चष्मा लावनार नाय, मला सगळे लोक हसतील, दुकूदे माझं डोकं.”
दोघी कपडे धुवायला लागल्या.
“सिंधू तिथला दिवा लाव म्हणजे तुला नीट दिसेल ” असं मी सांगताच जिजाई म्हणाली, “बाई, तुमी शिकलेल्या आसण दिवा म्हनता! “
“मग काय म्हणायचं ग?”
“लाईटी म्हना की.”
“अग दिवा हा शब्द मराठी आहे.”
“मग लाईटी काय दुसऱ्या मुलुखातला हाय काय?” ती माझ्या ज्ञानाची कीव करीत हसली. सिंधूची दोन मुलं गावाला, नवरा आणि सासूजवळ एक १२ वर्षाचा मुलगा पुण्याला घरकामाला आणि मोठ्या तेरा वर्षाच्या मुलीचं तिने लग्न केलं आहे. सिंधू तिची भावंडं, नवरा, कुणी कुणी शाळेत गेलेलं नाही. मग तिने तरी मुलांना शाळेत का घालावे?लिहिता -वाचता आलं नाही म्हणून काही बिघडत असं त्यांना वाटत नाही. ही कथा एकट्या सिंधूबाईची नाही. तिच्या गावाच्या पंचक्रोशीत हेच घडत आहे.
एक दिवस सिंधू म्हणाली, “तुमच्याकडे माझे पैसे आहेत ना, त्यात भरीला घालून हजार रुपये द्या.”
कशाला विचारलं तर म्हणाली, “जावय आलाय त्याच्या भावाचे लगीन हाय. दोन हजार रुपये मागतो. कुठून देऊ म्हणून हजार देतो!”
“मग छपराला कुठले पैसे ग?”
“बगु अजून पावसाला लई टाईम हाय!” पैसे घेतल्यावर म्हणाली, “भावाच्या मुलाचे, नणदेच्या मुलीचे, मुलीच्या दीराचे, इतक्या सगळ्यांची लगीन होणार आहेत. आता सर्वांना कुटून पैसे देऊ? आनी मी गावाला मातर पंधरा दिस जाईन, तवा बदली देईन तुम्हाला. बाई, सकाळी पाच रुपये, संध्याकाळी पाच रुपये भाजीला लागतात. भाव माजा माज्याकडे जेवतो, त्याची बायको गावाला गेलीय. आता भावाकडे कसे पैसे मागायचे. माज्या पोरीला जावयानं नीट वागवायला हवी म्हनून जावयाला पैसे दिले बघा. “
सिंधूबाई रंगात येऊन संसाराच्या गोष्टी सांगते. तिच्या मुलीचे तेराव्या वर्षी लग्न झाल्यावर मुलगी चौदाव्या वषी बाळंतीण झाली. त्यासाठी सिंधूबाई मुलीला गावाला घेऊन गेली. रात्रभर मुलीचे पोट दुखले. सकाळी सिंधूबाई तिला म्हणाली, दुपारच्या गाडीने डॉक्टरला दाखवायला जाऊ. झोप तू. आणि सिंधूबाई धुणे धुवायला नदीवर गेली. तासाभराने धाकटी मुलगी धावत येऊन सांगायला लागली. „अगं आये, येऊन बघ घरात बाळ रडतंय न्हवं.‟ सिंधूबाईने अभिमानाने ही हकीकत सांगितली . अज्ञानात, अशिक्षितपणात केवढा आनंद भरलेला असतो हे तिच्या चेहऱ्यावर तेव्हा दिसत होते.
बहुतांशी, नवऱ्यांनी टाकून दिलेल्या स्त्रिया एका वस्तीत, तर दुसऱ्या वस्तीत नवरा काही कमावत नाही म्हणून मुंबईला काम करायला आलेल्या बाया आहेत, यात सवती सुद्धा आहेत. त्या एकमेकींची मुलंही सांभाळतात.
प्रत्येक बाई घरकाम करून हजार-बाराशे रुपये कमावते . कुठे पोळ्या, स्वयंपाक असं काम असेल तर जास्त पैसे मिळतात . परंतु बैठ्या चाळीत एका खोलीत पाच-पाच बिऱ्हाड असतात. प्रत्येक कोपऱ्यात एकेकीचा संसार असतो. या जागेसाठी त्यांनी तीन हजार रुपये अनामत रक्कम भरलेली असते आणि महिना भाडं दोन अडीचशे रुपये असते.
नवनव्या वसाहतींमधल्या मध्यमवगीय, उच्च-मध्यमवगीय लोकांची रेशांकार्ड ही या बायांसाठीच असतात. नव्हे काम स्वीकारताना रेशनकार्ड दिल पाहिजे ही या बायांची महत्त्वाची अट असते. या बाया मुंबईत येऊन पैसे कमावतात म्हणजे यांच्याकडे पैशाचं डबोलं असलं पाहिजे असं त्यांचे नातेवाईक समजतात. आणि येऊन हक्काने त्यांच्याकडे राहतात. पैसे मागतात. सगेवाल्यांना नाही कसं म्हणायचं म्हणून मग या बाया पैसे देत असतात.
दोन-तीन लग्न करणं, सर्रास बायको टाकून देणं, मुलांना शिक्षण न देणं, लहान वयातच मुलांची लग्ने लावून देणं ही या समाजाची वैशिष्ट्ये आहेत. कुठला कायदा आणि काय? दहाव्या-बाराव्या वर्षापासून पैसे कमवायची सवय मुलांना लावतात. त्यामुळे शिक्षणाची गरज भासत नाही. या बायांना मी अनेक वेळा सांगते मुलांना शाळेत घाला ग.
त्या बाया मला नेहमी विचारतात , „बाई तुम्ही शिकलेल्या , तुम्ही पण पैसे कमावता आमी न शिकून पण कमावतो. शिकलेले लोक पन दारू पितात , शीग्रेट ओढतात, तंबाखू खातातच की नाय? तुमी मोठ्या घरात राहता आमी न्हान घरात राहतो. पण आमी मस्त राहातो. सिंधूबाई म्हणाली, „बाई, तुमच्या बिल्डींगीत मी सात माळ्यावर काम करते. त्यांच्या घरात दोन फोन हायेत, गाडी हाय, ते लोग येसफेस करतात. पन न्हवरा रोज बायकोला मारतो बघा.‟ तिच्या बोलण्यावर मी निरुत्तर झाले.
असा या बायांचा युक्तिवाद वर वर तरी बिनतोड असतो. काहींच्या गळ्यात तुळशीची माळ असते. इकडे बिनपगारी रजा घेऊन त्या वारीला जातात. आळंदी, देहू, पंढरपूर करून येतात. गळ्यात माळ घातल्यावर मांस, मासे खात नाहीत. एकादशीचा उपास तर सर्वांचाच असतो. मग प्रश्न उभा राहतो तो हा की, कोणत्या सामाजिक न्यायाने यांना शिक्षण द्यायचं..

मधुवंती सप्रे ९८२११७५३४९

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla