Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
प्रिय मुंबई (मुंबईवरील पुस्तकातील एक प्रकरण)
संकीर्ण लेख

प्रिय मुंबई (मुंबईवरील पुस्तकातील एक प्रकरण)Evening-time photograph of Juhu beachपावसाच्या ढगांनी आकाश गच्च भरलं होतं. नीलम समुद्राकडे पाहात उभी होती. समुद्राच्या लाटा दणादण आदळत होत्या, त्या पावसाला हाकारीत होत्या. बहुतेक दिनेशचा आणि तिचा चहा गॅसवर उकळत होता. दिनेश चहासाठी तिला बोलवत होता. ती तरातरा आत गेली, तिनं कपडे बदलले आणि ती दारापाशी आली, दार उघडणार इतक्यात दिनेश म्हणाला, “अगं, मी चहा गाळतोय. कुठे चाललीस?”

“इतकं पावसाळी वातावरण गरमागरम चहा घेऊया ना.”
“पावसाळी वातावरण आहे म्हणूनच चाललेय समुद्रावर.”
“पण इथून दिसतोय ना.”
“नाही रे, मला लांबून रोज दिसतो, जवळून पाहायचाय. नंतर घेईन चहा.” असं म्हणून ती लिफ्टपर्यंत गेली.
दिनेशला तिचं हे समुद्राचं वेड ठाऊक होतं. त्यानं स्वतःचा चहा कपात ओतला आणि चहा घेता घेता वर्तमानपत्र वाचत बसला.
नीलम लाटांच्या लड्यांमधे जाऊन उभी राहिली. लाटा तिला भिजवत होत्या. ती मागे मागे आली की तिच्या पायापर्यंत येत बिलगत होत्या. समोर अथांग समुद्र, दूर कुठे तरी होडी दिसत होती. पण वांद्रे वरळी सेतू झाल्यापासून समुद्राऐवजी त्या पुलाकडे आणि त्यावरून धावणाऱ्या मोटारींकडे लक्ष अधिक जायचं. समुद्राकडे पाहत बसलं की तो वाहतुकीचा व्यत्यय जाणवे.
दादर समुद्रावरची स्मशानभूमी टाळायची तर महापौर बंगल्याजवळून समुद्राकडे जावं लागे. दगडातून वाट काढीत ती वाळूपर्यंत पोचली. महालक्ष्मी मंदिराकडे झेपावत जाणारा समुद्र म्हणजे १७३० साली वरळीला बांधलेली भिंत तिच्या मनात अचानक आली. त्याबद्दलची कथा तिनं ऐकली होती. समुद्राचं पाणी अडवल्याशिवाय सलग भूभाग मुंबईसाठी मिळणार नाही. म्हणून वरळीला समुद्राला अडवण्यासाठी भिंत बांधण्याचे प्रयत्न १७१२ पासून चालु होते. वरळी व खंबाला हिल यामधून समुद्राचं पाणी आत शिरत होतं. चार्ल्सबून याने ही भिंत बांधण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. आठ वर्ष भिंत बांधणं चालु होतं. पण समुद्र दाद देत नव्हता. पैसा अक्षरशः पाण्यात गेला. पण नंतरचा गव्हर्नर विल्यम हार्नबी याने मात्र हे काम तडीस नेले. आज जिथे महालक्ष्मी मंदिर आहे ते तेव्हा नव्हतं. त्या मंदिराची दंतकथा नीलमला आठवली.

pic-mahalaxmiसमुद्राला थोपवणं शक्य होत नव्हतं तेव्हा त्या कामाचा ठेकेदार रामजी शिवजी याला स्वप्नात महालक्ष्मीने दर्शन दिलं. म्हणाली, मी समुद्रात आहे तिथून मला काढ. तेव्हा रामजीला खरोखर महालक्ष्मीला समुद्रात महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती या तीन मूर्ती सापडल्या. त्याची स्थापना केल्यावर समुद्र थोपवणं शक्य झालं.
नीलमला हसू आलं. म्हणाली, ‘खट्याळ कुठला!’ समुद्राला उद्देशून हे म्हणताना इंग्रजांनी देश पारतंत्र्यात ठेवला खरा पण त्यांनी या मुंबईसाठी काय काय केलं ? ते तिला आठवत राहिलं.
ती घरी आली. चहाला आज उशीरच झाला. ती आली तेव्हा दिनेश आंघोळीला गेला होता. त्याची न्याहारी, डबा तयार करणे या कामाला ती चहा घेताच जाऊन भिडली. परतताना पाहिलेले महापौर निवास, सावरकर स्मारक, संयुक्त महाराष्ट्र स्मारक आणि समोरचं शिवाजी उद्यानाचं मैदान, हे मनात होतंच.
दिनेश न्याहारी करताना म्हणाला, “मग समुद्राशी भेट चांगली झाली ना! आता कशावर विचार चाललाय?”
त्याचा डबा भरत असताना तंद्रीतून भानावर येत ती म्हणाली, “काय म्हणालास? अं समुद्राबद्दल बोललास ना! माहित आहे तू त्याच्यावर जळतोस ते.”
दिनेश हसला म्हणाला, ”तू जर मुंबईच्या प्रेमात असशील!” तिचा रागावलेला चेहरा बघून तो पुढे म्हणाला, “नाही गं, तुला मुंबई प्रिय आहे ना. मग सात बेटांची अखंड मुंबई कशी झाली? कोण होतं इथे पूर्वी? काही शोधलंय का?”
“इतकी बावळट किंवा अज्ञानी नाही बरं मी. वाचते आहेच. पण प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी जाणारही आहे.”
“म्हणजे मी ऑफिसला गेल्यावर?”
”होs, का? तुला असं का वाटलं?”
“नाही गं. त्यात काय तो तुझा समुद्र तुझ्याबरोबर आहेच की तुझा मोबाईल लागला नाही की समजेन त्याच्याबरोबर आहेस” आणि दिनेश हसतच ऑफिसला गेला.
old mumbaiनीलम खिडकीतून समुद्राकडे पाहत स्वतःशीच हसत राहिली. आणि मनाशी म्हणाली, ‘तुला अडवून खाडीत, खिंडित भर घालून तुला आताच्या या तुझ्या जागेवर आणून ठेवलं ना राज्यकर्त्यांनी? पण ते आम्हाला माणसांना जागा मिळावी म्हणून. तूही शहाण्यासारखा वागलास. इतक्या उंचीवरून तिला समुद्राचं पाणी स्तब्ध झाल्यासारखं वाटत होतं. आणि सतत त्या वरळी वांद्रे सेतूच्या मजबूत तारा त्यावरची वाहतुक पुनःपुन्हा तिच्या विचारात व्यत्यय आणत होती. कालच तिनं वाचलं होतं वरळी सागरी सेतूचं वजन पन्नास हजार आफ्रिकन हत्तीच्या वजना एवढं आहे म्हणून. सेतूची उंची साठ मजली इमारती एवढी आहे. तर त्यावरील मनोऱ्याची लांबी ६३ पट आहे.
पृथ्वीच्या परिघा इतक्या लांबीचा म्हणजे ४०,०७६ किलोमीटर लांबीच्या पोलादाच्या तारांचा वापर इथे केला आहे. वांद्रे वरळी रस्त्यावरून जायचं तर ते अंतर ७.७० कि.मी. आहे. पण सेतूवरून जायचं तर ४,७० कि.मी. आहे. म्हणजे ३ कि.मी.साठी एवढा कोट्यावधीचा प्रकल्प उभा केला गेला. त्याची दुसरी बाजू म्हणजे उपनगरातून मुंबईत जायला आणखी एक रस्ता तयार झाला. धारावी, सायन, माहीम याच बरोबर हा चौथा रस्ता झाला. शिवाय उपनगरी गाडीचा लोहमार्ग आहेच.
माहीम ते शिवाजी पार्कच्या रस्त्याचं नाव लेडी जमशेटजी रोड आहे. कारण वांद्र्याची खाडी मधे असल्याने वाहतुक होडीतून व्हायची. लेडी जमशेटजीने वांद्रे माहीम पुल बांधला आणि उपनगरं मुंबईला जोडली गेली.
आणि आता परत अजून एक हा सागरी पूल बांधला गेला. तसा तर धारावी वांद्रे मिठी नदीवर पूल नंतर बांधलाच होता.
‘तेव्हा तुला ओलांडण्याचे प्रयत्न, थोपवण्याचे प्रयत्न सतत चालुच आहेत. वरळीची भिंत बांधली दोनशेवर्षांपूर्वी. तर कफपरेड, नरीमन पॉईंटला सुद्धा तुला हटवून जमीन तयार केली गेली. मग अंधेरी बोरीवली इथेही तेच. इतकंच काय आम्हाला बोटीनं प्रवास करता यावा, माल वहातुक करता यावी, सैन्य नेता यावं म्हणून भाऊचा धक्का, करनाक, क्लेअर ही बंदरे तयार झाली. लक्ष्मण हरीश्र्चंद्र उर्फ भाऊ या महापालिकेच्या कचरा कंत्राटदाराने मुंबईतला कचरा तिथे टाकून बंदरे उभारली आज भाऊचा धक्का या भाऊ अजिंक्य या माणसाच्या नावाने ओळखला जातो. परवाच भाऊच्या धक्क्यावर जाऊन आले तिथलं तुझं रूप काही वेगळंच आहे. समोर खांदेरी उंदेरी बेटं दिसतात आणि आजूबाजूला महाकाय बोटी आणि तुझ्या पाण्याचा चुबुक चुबुक आवाज. बाकी काही नाही.
मग मला इंग्रजांनी हे बेट तुझ्यासह ताब्यात घेतलं तेव्हाची कविता आठवली.
निमे मुंबई सागरामाजी होती
बहुलोक वस्ती असीतैन होती
महाघोर राने तशा शेतवाड्या
लघू झोपड्या झावळ्यांच्या कवाड्या
तू जागा मिळेल तिथे आपल्या लाटांना घुसू देत होतास मुंबईत सर्वत्र दलदल झाली कारण ओहोटी लागली की तुझ्या लाटा तुझ्याकडे परत येत. दलदलीमुळे डास होत असत. इथे पाणी नसे. मग मुंबईला मुंबापुरी ऐवजी यमपुरी म्हणत. म्हणून तुला मागे रेटून माणसांना इथे काही नवं घडवावं लागलं. तुला मागे रेटताना खूप आर्थिक नुकसान सोसवं लागलं.’
नीलमचा मोबाईल वाजला आणि ती समुद्राच्या ध्यानधारणेतून भानावर आली. पण मोबाईलवरचं बोलणं ऐकून (संपवुन) ती परत समुद्राच्या दिशेने पाहात बसली. उन्हं लाटांवर परावर्तित होत होती. मधेच मळभ येत होतं आणि समुद्राचं पाणी हेलकावत लाटांना ढकलत होतं. काही लाटा उंच उसळी घेत होत्या.
तिच्या मनात आलं ‘मुंबईवरती मराठीत १०/१५ तरी पुस्तकं लिहीली गेली. पण मुंबईचा सखा, मित्र असलेला हा भवसागर यावर मात्र कुणी एक ओळ लिहिली नाही. हा नजराणा कुणाच्या नजरेत भरलाच नाही कसा? मला फक्त स्वातंत्रवीर सावरकरांची कविता आठवते. सागरा प्राण तळमळला तेव्हा तू त्यांना साहाय्य करायला हवं होतंस. लाटांच्या माध्यमातून तू दुसऱ्या देशातल्या समुद्राला सावरकरांचं रक्षण कर असा संदेश द्यायला हवा होतास. जाऊ दे आता मी असं म्हणून काय उपयोग आहे?
पण समुद्रा तू इथल्या सात बेटांमधे घुसला होतास. मूळ मुंबई सात बेटांची. ही बेटं पोर्तुगीजांनी वर्षाला रु. ७० ते १०० घेऊन भाड्याने दिली होती.
इंग्रजांना या शहराचा ताबा १६६५ साली मिळाला आणि १६६८ ला ईस्ट इंडिया कंपनी स्थापना झाली आणि इंग्रजांना उपयुक्तता समजली. मुंबई हे नैसर्गिक बंदर आहे. याचा त्यांना शोध लागला.
ती सात बेटं तुझ्या कृपेवर अवलंबून होती. ओहोटी लागल्याशिवाय माणसांना ये जा करता येत नसे.
ही बेटं म्हणजे आजही त्यांची नाव तीच आहेत. पण पूर्वी ही बेट एकमेकांपासून दूर होती असं आज खरं वाटणार नाही.
१) वाळकेक्श्र्वर, गिरगाव, फोर्ट, डोंगरी हे मुख्य बेट होतं आणि त्यालाच मुंबई म्हणत. १७३० साली ती जोडली.
२) शीव, माटुंगा, परळ १८०५ साली जोडलं.
३) माजगाव (किती साली?)
४) छोटा कुलाबा १८३० साली जोडलं. याला ओल्डवुमन्स आयलंड असं म्हणत. हा अलओमानचा अपभ्रंश. कारण ओमानचे अरब येथे राहत असल्याने हे नाव पडलं.
५) मोठा कुलाबा १८३८ साली जोडलं.
६) वरळी १७१० साली जोडलं.
७) माहीम ही प्राचीन बेटं आहेत. १८४५ साली माहीमला वांद्रे गाव जोडलं गेलं.
आणि त्याच काळात वांद्रे ते वसई या भूभागाला सालसेटे बेटं म्हणत. मुंबईतून या गावाला जायला रस्ता नव्हता समुद्रातून होडीनं जावं लागायचं. पुढे रस्ते, रेल्वे यांचं जाळं तयार झालं.’
समुद्राकडे पाहात असताना नीलमनं मुंबईबद्दलचे संदर्भ शोधले. किती राजसत्ता या मुंबई बेटावर येऊन नांदून गेल्या हे वाचताना ती रोमांचित झाली.
पहिला संदर्भ घारापुरीचा होता. वीसवर्षांपूर्वी ती घारापुरी (एलिंफटा) ट्रीपला गेली होती. आणि हो आपल्याला दिनेश तिथेच प्रथम भेटला. एवढी वर्ष झाली तरी दिनेश कालच भेटलाय असं त्याच्या सहवासात जाणवतं. किती ऋजु स्वभावाचा आहे तो. ती स्वतःशीच हसली. पुढे वाचू लागली.
old mumbai 1पोर्तुगीज येण्यापूर्वी इथे बरीच साम्राज्ये उदयाला आली. ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात आर्य संस्कृती नांदत होती. ठाणे, घारापुरी, माहीम या भागावर त्यांची सत्ता होती. नालासोपारा, कल्याण, जंजिरा, चौल या पश्र्चिम किनाऱ्यावर थोडाफार व्यापार होता. मुंबईची बेटं शांत होती.
घारापुरी (एलिफंटा)वर मौर्य घराण्याची सत्ता होती. पण ६१० साली कर्नाटकातील बदामी चालुक्याने जहाजांचा ताफा घेऊन या बेटावर चढाई केली आणि मौर्यांचा पराभव केला. नंतर शिलाहार साम्राज्य इस. ८१० ते १२६० घारापुरी ते ठाणे या भागात होते. समुद्र मार्गे सर्व व्यवहार चालत इतक्या मुंबईच्या जवळ या सत्ता होत्या. पण मुंबईनं तिकडं नजर वळवून पाहिलं नाही. हे शिलाहार राजे म्हणजे शंकराचे भक्त त्यांनीच घारापुरीला खडक कोरून शिवमंदीर बांधलं आणि मुंबईत शिरून मलबार हीलवर वाळकेश्र्वराचं देऊळ बांधलं. या देवळाला शिवाजी महाराजांनी भेट दिल्याची आख्यायिका आहे.
या काळात मुंबईत कोळी व भंडारी समाज राहत होता. त्यात पाठारे प्रभु, कायस्थ, यजुर्वेदी ब्राह्मण यांची भर पडली.
हे शिलाहार साम्राज्य बुडालं १२६५ साली. देवगिरीच्या महादेवानी चढाई करून घारापुरी जिंकली. म्हणजेच आज तरी पर्यटन स्थळ म्हणून घारापुरीला लोक जात असले तरी सात बेटांमधे विभागलेल्या मुबईपेक्षा राजांचं लक्ष्य घारापुरी बेटाकडे होतं. त्याचं महत्त्व त्यांना जास्त वाटत होतं. नीलम मनाशी म्हणाली, ‘१४व्या शककात राजा बिम्ब याची सत्ता मुंबईवर होती. हा पाठारे प्रभु समाजातला. त्याने माहीम बेटावर आपली राजधानी केली. इथे त्याचा भव्य राजवाडा होता. ‘प्रभादेवी’ या कुलदेवतेचे मंदीर होते.
इथपर्यंत मुंबई शांत होती. घडणाऱ्या गोष्टी पाहत होती. सात बेटं आपआपल्या हद्दीत नांदत होती.
परंतु आता हिंदु राजानंतर मुंबईकडे झेपावण्याचे वेध गुजरातच्या सुलतान मुबारकशहाला लागले. इ.स.१३२० साली त्याने आपले राज्य सालसेटे बेटांपर्यंत वाढवले आणि त्याला मुंबईची सात बेटे हवी वाटू लागली.
१३४७ साली गुजरात दिल्ली आणि दख्खनचे मुसलमान राजे मुंबईवर हल्ले चढवु लागले. त्यात हिंदु राजा लढाईत पडला. त्याच्या राणीने लढाई चालु ठेवली. पण शेवटी मुसलमानांचा जय झाला. तेव्हापासून १५३४ पर्यंत म्हणजे १८७ वर्ष मुंबईवर मुसलमानांचे राज्य होते.
सुरवातीला मुंबईच्या भंडारी समाजाने मुसलमान राजवटी विरुद्ध बंड केलं. पण त्यांना यश मिळालं नाही.
परंतु परदेशातून आलेल्या पोर्तुंगीजांनी मात्र १५३४ साली गुजरातचा सुलतानाकडून मुंबई काबीज केली पुढे १३१ वर्षे पोर्तुगीज मुंबईत होते. मुंबईची बेटं अलग अलग पण जवळ जवळ असल्याने नारळी, पोफळी, आंबे यांच्या बागा भातशेती यामुळे मुंबईला एक वेगळं असं हिरवाईचं सौंदर्य प्राप्त झालं.
पोर्तुगीजांनी जरी मुंबईची बेटं ताब्यात घेतली तरी ते काही शहर वसवणं, सुधारणा करणं याचा विचार करत नव्हतेच. त्यांना हे बेटं अस्वच्छतेमुळे डोईजड वाटू लागली म्हणून त्यांनी काही भाग भाड्यानं दिला.
परंतु पोर्तुगालनं इंग्लडच्या राजाला पोर्तुगाल कन्या दिली तेव्हा ही बेटं आंदण दिली तरी मुंबईतले पोर्तुगीज संथच होते. मुंबईचं खरं महत्त्व ओळखलं इंग्रजांनी. मुंबईचा अरबी समुद्र हा त्यांना आव्हानात्मक व जवळचा वाटला. जलमार्गाने ते आले. माल व प्रवासी वहातुक मासेमारी असा समुद्राचा उपयोग. पुन्हा मुंबई चारी बाजूंनी समुद्नाने वेढलेली. ही सगळी बेट तुटलेली होती. ओहोटीत कुलाब्यापर्यंत चालत जाता येत असे. पोर्तुगीजांनी इंग्रजांपूर्वीच इथे ख्रिश्र्चन धर्म रुजवायला सुरवात केली त्यासाठी चर्चेस बांधली गेली. आजचं माहीम चर्च (सेंट मायकेल) १५३४ साली बांधलं गेलं. त्यावेळी मुंबईत पोर्तुगीज भाषा बोलली जात असे. इतकी की इंग्रजांना त्याचे भाषांतर करावे लागे. चार्ल्सचं लग्न झालं १५ मे १६६२ रोजी. पण मुंबईचा ताबा ईंग्रज अधिकाऱ्याला मिळाला (हंफ्रेकुक) ८ फेब्रुवारी १६६५ तोपर्यंत पोर्तुगीजांबरोबर वाटाघाटी, पत्रव्यवहार चालु होता. गंमत म्हणजे पोर्तुगाल व इंग्लड यांच्या राजकीय वकिलांनी मुंबई आंदण द्यायची ठरवली तेव्हा मुंबई नेमकी कुठे आहे हे ठाऊक नव्हतं. त्यांनी लिहीलं किल्ले आणि शहरे यांनी भरलेलं मुंबई बेट ब्राझीलपासून थोड्याच अंतरावर आहे. हे वाचताना नीलमला गंमतच वाटली. हंफ्रेकुकने फक्त १२० इंग्रजांच्या मदतीने ताबा मिळवला. एकदा इंग्रजांना मुंबई सापडल्यावर मात्र त्यांनी हातपाय पसरायला सुरवात केली. ज्या चार्ल्सला हे बेट आंदण मिळालं होतं तो मात्र दुःखात होता. पोर्तुगाल राजकन्या ही त्याची पत्नी मंदबुद्धीची आणि सतत आजारी. त्याला हे हुंडा म्हणून मिळालेलं बेट शाप ठरला त्यातच तो कर्जबाजारी झाला होता. मग त्याने ईस्ट इंडिया कंपनीला सर्व हक्कांसह मुंबई भाड्यानं देऊन टाकली. ही ईस्ट इंडिया कंपनी काही व्यापाऱ्यांनी लंडनमधे ३१ डिसे.१६०० साली स्थापन केली. तर काही इतिहासकार ही कंपनी १६६८ साली स्थापन झाली असं लिहितात.
एक सुस्कारा सोडून नीलम स्वतःशीच म्हणाली, ‘ती पॅरिसमधे राहाणारी ख्रिस्तीन आणि नगरमधे राहाणारा परेश यांना काय कळणार मुंबईचं क्षणोक्षणी बदलणारं रूप. आणि मी म्हणे त्यांची शिक्षिका!’ नीलम गंभीरपणे विचारात बुडाली.
शिवाजी पार्कच्या समुद्राकडे जातानाचा परिसर सतत तिच्या नजरेसमोर होता. लग्नसमारंभाच्या हिरवळींची कार्यालये, म. गांधी तरण तलाव, नव्यानं उभं राहिलेलं संयुक्त महाराष्ट्राचं शिल्प, सावरकर स्मारक समुद्राला लगटूनच आहे. त्यांचा आणि सागराचा एक वेगळाच आप्त संबंध सतत नजरेसमोर समुद्र आणि त्याला चिकटून उभ्या असलेल्या इमारती आणि समोर दिसणारं शिवाजी उद्यान. त्यातही इमारती आहेतच. शिवाजीमहाराजांचा पुतळा तिला मुद्दाम शोधून पाहावा लागला. कालीमातेचं मंदिर त्या समोरची ... स्काऊट हॉल, बंगाली क्लब वगैरे. काही वर्षांपूर्वी समुद्र सरळ वीर सावरकर मार्गावर होता. कदाचित सावरकरांच्या स्मारकाला त्याला भेटावसं वाटलंअसेल. सागरा प्राण तळमळला ऐवजी सागराचा प्राण तळमळला असेल. म्हणून आता खूप मोठे दगड दादर चौपाटीच्या किनाऱ्यावर टाकले आहेत उंच भिंत बांधली गेली आहे. पुन्हा तिला तो इंग्रज आले ते १७ व्या शतकातलं आठवायला लागलं.

- मधुवंती सप्रे

(Image Courtesy- Google.com)

 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla