Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
ब्लॉग मधून….काही आवडलेले …
संकीर्ण लेख

ब्लॉग मधून….काही आवडलेले …
नृसिंह अवस्था....

nos.1अनेकांना अनेक आकडे अनलकी असतात. कुणाला तीन तर कुणाला आठ तर कुणाला तेरा. ह्यात दोष बिचार्या आकड्यांचा नसतो तर त्यामुळे आलेल्या काही अनुभवातून बदललेल्या माणसाच्या दृष्टिकोनाचा असतो आणि आकडा उगाच बदनाम होतो !

त्यात चाळीस हा आकड़ा खरच दुर्दैवी. तो युनिव्हर्सल शापित आहे. त्याच्या वाईटपणाची साक्ष अगदी शालेय जीवनात पटते. म्हणजे आम्ही शाळेत असताना वर्गात अठ्ठावन ते साठ मुले असत. निकाल लागला की चाळीसच्या खाली नंबर आलेली "गाळसाळ" समजली जात ! तापमान चाळीसच्या वर असलेली शहरे अतिउष्म समजली जातात ! चाळीसपेक्षा कमी वजन म्हणजे अशक्त ! इतकेच काय तर साधा गाडीचा वेग चाळीसपेक्षा वाढला की इंधन जास्त जळत अस म्हणतात ! तर असा हा अनेक बाबतीत मैलाचा दगड ठरणारा चाळीसचा आकडा माणसाच्या आयुष्याचा घाटमाथा समजला जातो !

ह्या चाळीशीबरोबर माणसाचा "वॉरंटी पीरियड" म्हणे संपतो आणि मग चष्म्याच्या नंबर पासून ईतर "चाळीशी" नामक भूतं मानगुटीला बसून "पेड सर्विसिंग" पीरियड सुरु झाल्याची आठवण करून देत राहतात ! काहीजणांच्या साथीला मग मधुमेह, हायपर टेंशन असे आयुष्यभर पुरणारे "खानदानी" मित्र ह्याच काळात येतात. दादा, ताईचे काका, काकू, मावशी ह्याच चाळीशीत होतात. उरल्यासुरल्या काळ्या केसात दिवसेंदिवस आगोचरपणे वाढणारी "चांदी" वाढणाऱ्या पोटाच्या घेराशी स्पर्धा करत असते. जीम आणि मॉर्निंग वॉक हा केसाला लावलेल्या कलपाइतकाच क्षणभंगुर ठरतो ! चाळीशीसमोर सामान्य माणूस शरीरापेक्षा मनाने हरतो ! चाळीस हा आकडा परत एकदा दुर्दैवी ठरतो !!!

पण what the hell? चाळीशी लागलेले डोळे जरा उघडे ठेवून आयुष्याकडे पाहीले तर चाळीशी आवडू लागेल. चाळीशी म्हणजे "नृसिंह अवतार" असल्याचे लक्षात येईल ! ना नर, ना सिंह, ना दिवस ना रात्र, ना घरात ना बाहेर ! आयुष्याच्या उंबरठ्यावरची ही संधीप्रकाशाची वेळ खूप आकर्षक असते. साधे उदाहरण द्यायचे झाले तर अठरा हे वय ड्रायव्हिंग लायसन्स काढायची परवानगी कुणालाही देते तशीच चाळीशी "आयुष्यावर बोलू काही" प्रकारचे तत्वज्ञान सांगायचा परवाना कुणालाही मिळवून देते. उदाहरणच द्यायचे झाले तर हल्ली माझ्यासारखे अनेक "फेसबुक लेखक" त्याचा पुरेपूर फायदा घेऊन चांस पे डांस करताना आढळतातच ना? आणि why not? कारण आता बायको आणि बॉस सोडल्यास सर्वसाधारणपणे "का" विचारणारे किंवा आपण कितीही किरकोळ अथवा मिडिओकर असलो तरी तोंडावर अपमान करणारे फारसे कुणी उरलेले नसते. "वयाचा मान म्हणून" तरी लोक आपले विचार, लेखन ह्याची तोंडदेखली का होईना दखल घेत असतात, क्वचित खोटे का होईना कौतुक तर करत असतात. So enjoy that!

चाळीशी तरुणांना "मार्गदर्शन" करायचा हक्क जसा मिळवून देते तसाच वृद्ध लोकांचे समुपदेशन करायचे लायसन्स पण देते. नात्यातील गांजलेली म्हातारी लोक "सल्ला" घ्यायला चाळीशीतील "नृसिंहाकडेच" येतात. आयुष्यात साधारणपणे थोडेसे स्थैर्य आलेले असते. पुढची वाट अंधुक का असेना पण दिसत असते. मुल मैत्री करायच्या वयाची झालेली असतात. सोशल सर्कल सेट झालेले असते. नवरा किंवा बायको ह्यांनी एकमेकांना गुणदोषांसकट स्वीकारून अनेक वर्ष उलटल्याने त्यात आता काही उलथापालथ व्हायची भीती आणि शक्यता जवळजवळ मावळलेली असते. पूर्वी केलेल्या चुकीच्या गोष्टी आणि घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचे परिणाम देखील पाहून झाल्याने ह्यापुढे बरोबर काय असेल ह्याची रूपरेशा तयार असते. निदान चूक काय ते निश्चित माहीत असते. कोणतेही प्रलोभन किंवा व्यसने न लागण्याइतकी प्रगल्भता आलेली असते. आयुष्याचे विमान साधारण "ऑटो पायलट" वर टाकायच्या उंचीवर आलेले असते ! मग ते खरच थोडा काळ ऑटो पायलटवर टाकून बाहेर पसरलेले विस्तीर्ण आकाश, त्यातील हाताशी दीसणाऱ्या असंख्य चांदण्या, समोर दिसणारा पिठुर चंद्र, अनंत आकाशगंगा ह्यांचा आनंद का लुटू नये ? लँडिंग आहेच नशिबात पुढे केव्हातरी. पण हे क्षण आयुष्याच्या खिडकीतून बाहेर पाहून का साठवून ठेऊ नयेत?

पंचवीशी ते चाळीशी ह्या मध्यन्हच्या उन्हात आपले आणि कुटुंबियांचे आयुष्य सुखावह व्हावे म्हणून सोसलेल्या चटक्यांना ह्या संधिप्रकाशाच्या सुंदर काळात थोडे आनंदाचे, निवांतपणाचे मलम लावा. पोरं अजुन स्वतंत्र झाली नाहियेत म्हणून विचारत आहेत, शरीर पुर्वीइतके सळसळते तरुण नसले तरी वृद्ध नक्कीच नाहिये म्हणून उत्तम साथ देत आहे मग मन "चाळीशी" मध्ये मनाने का अडकावे?

खरतर ही वेळ आहे आयुष्याला चॅलेंज करायची. त्याने शिकवलेले अनुभव वापरून, इच्छा असल्यास चाकोरी मोडून आपल्याला आनंद मिळेल ते सुरु करण्याची. माझ्या काही मित्रांनी ह्याच वयात उत्तम पगार देणाऱ्या नोकर्यांना लाथ मारून त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात व्यवसाय सुरु केला. एका नव्या आयुष्याला सुरुवात केली. समोर एक नवीन ध्येय ठेवले. गाठीला अनुभव होताच. काही मित्रांनी जॉगिंगला सुरुवात केली आणि आज वयाच्या पंचेचाळीस, अठ्ठेचाळीसाव्या वर्षी मॅरेथॉन धावणारे हेच माझे मित्र आहेत. काही शेती करायला शहर सोडून गावाला गेले, अनेकांनी सामाजिक उपक्रमात स्वतःला जोडले !

आयुष्याच्या विमानाचा डिसेंड सुरु व्हायला अजुन अवकाश आहे. आत्तातर कुठे "सिट बेल्ट ऑफ" ची साईन आली आहे. ही वेळ आणि वय आहे "क्रूझ" करायच, नवी क्षितिजं गाठायच, नवी आव्हान स्वीकारायचं, आयुष्याकडून शिकायचं, जे शिकलो ते इतरांना द्यायचं ! कारण चाळीशी म्हणजे नृसिंह अवस्था ! ना तरुण ना म्हातारा, ना नवशिका ना पूर्ण अनुभव संपन्न, ना खूप आसक्ति ना पूर्ण विरक्ति, ना पूर्ण सौष्ठव ना गलित गात्र, आयुष्याच्या एका फेज मधून दुसऱ्या फेज मधे जायचा उंबरठा.... संधीप्रकाशाचा अद्भुत विस्मयकारक काळ !

अरे जमवा मित्र दर महिन्याला. घेऊन जा घरच्यांना फॉरिन ट्रिपला...नसेल परवडत तर शक्य असेल तिथे. जमतील तसे आणि तेथे आपले अनुभव शेयर करा. आपण आयुष्यात अनुभवलेले खड्डे चुकवायला इतरांना मदत करा. पोरांचे मित्र व्हा. त्यांच्या मित्र मैत्रिणींचे buddy व्हा. सामाजिक कार्यात सक्रीय भाग घ्या. सभ्यतेच्या परिघात राहून बिनधास्त फ्लर्ट करा, गॉसिप करा, शाळेची गेट टुगेदर आयोजित करा, ट्रेकला जा, रिक्शा किंवा टैक्सीवाल्यावर दादागिरी करून "आवाज कुणाचा" चे ऐन जवानीतले जोशाचे दिवस कधीतरी परत अनुभवा, औषधे किंवा गोळ्या ज्यांच्या नाशिबी लागल्या असतील त्यांनी त्या नेमाने घ्या पण एखाद्या पार्टीत मित्रांबरोबर कॉलेजातल्या पहिल्या क्रशची आठवण जागवताना क्वचित एखादा पेग जास्त झाला तर त्याची झिंग पण एन्जॉय करा ! पावसात भिजा, जोगिंग करा, सूर्यनमस्कार घाला, लॉंग ड्राइव्हला जा, सिनेमे पहा ! काका म्हणतील त्यांचे काका व्हा, दादा म्हणून जवळ येतील त्यांचे थोरले बंधू व्हा, अनुभवाचं ओझ इतरांना वाटून थोडं हलकं करा ! मुख्य म्हणजे हसत रहा !

ह्या काही काळच अनुभवता येणाऱ्या नृसिंह अवस्थेत स्ट्रेस, अंसर्टिनिटी, द्वीधा मनस्थिति, प्रापंचिक भीती, भविष्याची चिंता, आर्थिक विवंचना, वैचारीक मेनोपॉज ह्या आणि अश्या नतद्रष्ट हिरण्यकश्यपु राक्षसांचा खातमा करावा ! पायात जोर असेल तर चढापेक्षा उतार सोपा असतो हे लक्षात ठेवावे. हे एकदा मनाशी पक्के बांधले की चाळीशीचा घाटमाथा म्हणजे पालिकडल्या उताराची सुरुवात न वाटता अलिकडचा चढ चढून शिखर सर केल्याचा आनंद देऊ शकतो. चाळीशी हे टेंशन न रहाता सेलिब्रेशन बनते. मग चाळीस हा फक्त एक आकडा रहातो...जस्ट अनदर ब्लडी नंबर...एंड नॉट सो अनलकी !!! चियर्स !

-Blog : MJ दिल से....

 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla