चाळ संस्कृती - फ्लॅट संस्कृती
घरकुल लेख

चाळ  संस्कृती - फ्लॅट संस्कृती

khotachi vadiसंस्कृती म्हणजे जगण्याची पद्धती (style of living) अशी सोपी सुटसुटीत व्याख्या संस्कृती या शब्दाची आचार्य अत्रे यांनी केली आहे.ग्रीक संस्कृती , रोमन संकृती, पाश्चात्य संस्कृती, पौर्वात्य संस्कृती, आर्य संस्कृती , भारतीय संस्कृती हे शब्द प्रयोग, अगदी परिचित आहेत.मुंबई शहरात परळ -लालबाग ही  कामगार संस्कृती, परेडरोड- मलबारहिल ही  उच्चभ्रू लोकांची संस्कृती, दादर,खार, बांद्रा, सांताक्रूझ, पार्ले हि उच्च मध्यम वर्गीयांची संस्कृती, झोपडपट्ट्या ही  मागासवर्गीयांची संस्कृती अशा अनेक प्रकारच्या संस्कृती आपल्या देशात उदयाला आल्या व स्थिरावल्या आहेत.त्यात आणखी दोन संस्कृतींची भर पडली आहे.एक म्हणजे चाळ संस्कृती व दुसरी फ्लॅट संस्कृती.


वरळीतील बी.डी.डी. चाळ जिला बावन चाळ असेही संबोधले जाते., गिरगावातील शांतारामाची चाळ या प्रसिद्ध चाळी  आहेत.शांतारामच्या चाळीत अस्मादिकांनी आठ वर्षे वास्तव्य केले. त्यामुळे चाळ  संस्कृती अगदी जवळून पाहता आली.याच चाळीत लो. टिळकांनी पहिला गणेशोत्सव साजरा केला असे म्हटले जाते.या गणेशोत्सवी महोत्सवाला मी उपस्थित होतो. ह्या समारंभाला महाराष्ट्राचे पहिले भूतपूर्व मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण उपस्थित होते.समारंभाचे ते प्रमुख अतिथी होते. टिळकांच्या आठवणीने ते भारावून गेले.
गिरगावात चाळीप्रमाणे वाड्या आहेत.फणसवाडी, गायवाडी, झायाबाची वाडी इ.वाडी म्हणजे एक वसाहत होती. लोकांमध्ये एकोपा असायचा, मजल्यावर सर्वांची मिळून वर्तमानपत्रे असत. त्यात लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया या शिवाय साप्ताहिक विविध वृत्त घेतले जाई.किंमत विभागून  घेतली जाई. पत्रवाटपाचा क्रमही ठरलेला असे. सार्वजण समजुतीने वागत.ह्या योजनेमुळे थोड्या पैशात बरीच वृत्तपत्रे वाचायला मिळत. रद्दी कोणातरी एकाने ठेवायची व वर्षाकाठी विकून येणाऱ्या पैशातून भिशीचा कार्यक्रम व्हायचा.कोणाकडे लग्न ,मुंज वगैरे असले तर केळवणाचा सामुहिक कार्यक्रम असायचा.प्रेझेंटही याच पद्धतीने दिले जाई.त्यामुळे अनेक त्याच त्याच वस्तूंपेक्षा एक भरीव व उपयुक्त वस्तू घेता येणे शक्य होते. असा बंधुभाव व सदभाव लोकांत जोपासला जाई.    

 

girgao chawl in mumbai 1 चाळीत आपपर भाव नसे . कोणीही कोणाकडे जावे . फ्रीज उघडून थंड पाण्याची बाटली घ्यावी हा तो भाव.रात्रीच्या वेळी गप्पा गोष्टीला सगळे एकत्र जमत.एखाद्याने हाक द्यावी ,"आहो बाळू तात्या ,म्हटलं भाजी उरली आहे. वांग्याबटाट्याची  रसरशीत रस्सा भाजी आहे. देऊ का पाठवून ?"आहो द्याकी पाठवून. वाट कसली पाहताय?आमची जेवणं व्हायचीच अजून" असा जिव्हाळा असायचा. चाळीत मजल्यावर नळ एक.बायकांचे नंबर लागत.त्यावरून क्वचित भांडणेही होत.पण ती तेवढ्यापुरतीच. पहाटे  ३.३० ला लोक उठत. चारला नळ यायचा. सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास पाणी. तेवढ्या वेळात धुण्यांचे , पाणी भरण्याचे आवाज येत. मुंबईला झोप तशी ३-४ तासच मिळते. ' धांदल' हा मुंबईकरांचा स्थायी भाव. 'पळापळ' पाचवीस पुजलेली.

झावबाच्या वाडीत माझे एक नातेवाईक राहत.त्यांच्याकडे मी गेलो होतो.माचाणासारखा मजला चढवून त्यांत ते राहायचे.पण आनंद असा की  तो  इतरत्र मागून मिळणार नाही.या चाळ संस्कृतीचे दर्शन 'संभूसांची चाळ' ,'बटाट्याची चाळ' 'चाळ नावाची वाचाळ वस्ती' या नाटकांतून नाटककारांनी घडवले आहे.

परंतु हल्ली बिल्डरांची नजर या चाळीवर पडली आहे. एकामागोमाग एक चाळी हस्तगत करून ,त्या पडत त्यांच्या जागी मोठे मोठे मॉल्स किंवा टोलेजंग अकरा अकरा मजली इमारती बांधण्याचा सपाटा चालवला आहे.चाळीतील एकोप्याऐवजी सोसायट्या स्थापन झाल्या. कायदे कानून आले.चाळीतील रहिवाश्यांना सेल्फ कन्टेण्ड  फ्लॅटस मिळाले. त्यातूनच फ्लॅट संस्कृती उदयाला आली.लोकांनी एकत्र यायचे ते फक्त मिटींगसाठी यायचे, एरव्ही प्रत्येक जणाने आपापल्या फ्लॅटमध्ये बंदिस्थ होऊन बसायचे.'घरोबा', 'जिव्हाळा' हे शब्द कोशात जाऊन दाखल झाले.व त्यातून उदयाला आली ती फ्लॅट संस्कृती.

flats in mumbaiफ्लॅटला मराठी शब्द आहे तो सदनिका. वन रूम किचन , वन बी. एच.के.,२ बी.एच.के. हे शब्द सर्रास वापरले जाऊ लागले.धुणी ,भांडी सगळ घरात. सार्वजनिक काही नाही. सुख सुविधा वाढल्या.जीवन आरामदायी झालं.भांडणे गायब झाली पण त्यामुळे एक प्रकारचा तुसडेपणा वाढू लागला.कोणाचा
पायपोस कोणाला नाही.स्वत:पुरत पाहण्याची संकुचित ,माणूसघाणी वृत्ती निर्माण झाली.चाळीतील कोणाचे निधन झाले तर सगळे जण सांत्वन करायला धावून येत.अंत्ययात्रेला सर्व चाळच्या चाळ  लोटत असे.पिठाल भात करून खायचा रिवाज असे.फ्लॅटमध्ये कोणाच निधन झाल तर "लवकर बाहेर पडल पाहिजे ,नाहीतर अडकून पडायला होईल."अशा चर्चा सुरु झाल्या.निधना संबंधी नोटीस नोटीस बोर्ड वर लागू लागली.फार झाल तर एखादी शोकसभा ,शोक प्रस्ताव ,भाषण बाजी,थोडक्यात काय फ्लॅटसंस्कृतीमुळे मृत्युचेही मोडर्नायझेशन झाल. मानवी मूल्य अस्तंगत होऊ लागली.

चाळी नामशेष झाल्या काही होण्याच्या मार्गावर आहेत.एक दिवस असा आढळेल कि एकही चाळ मुंबई शहरात आढळणार नाही.सर्वत्र टोलेजंग इमारती व फ्लॅटस.पुढच्या पिढीला कदाचित चाळींचे दर्शन नाटक , सिनेमांतून,किंवा चित्रातून होईल.पण चाळ संस्कृतीचे दर्शन त्यांना होऊ शकेल काय?- कृ.म. गात   (०२२-२६१७६९८८)                        

 

संबधित लेख- बदलते घरकुल मुंबईचे .....
                   घर सजवताना........

 

तुमचे काही अभिप्राय व सूचना किंवा आमच्या सदरांबद्दल अधिक माहिती तुमच्याकडे असेल तर त्याचे सदैव स्वागतच असेल.संपर्क  :Email  This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla